– हिमांशू
ज्यांच्या खिशात पैसा खुळखुळत असतो, त्यांच्यासमोर जग झुकतं. पण ज्यांच्यासाठी विमानातसुद्धा स्वतंत्र ‘क्लास’ असतो, त्यांच्या सार्वजनिक वर्तनातूनही तो ‘क्लास’ दिसावा, ही अपेक्षा अवास्तव नाही. अर्थात, कोणतीही नशा त्यातही नशेला संतापाची जोड मिळाली, तर केवढा अनर्थ घडू शकतो, याचा नमुना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये नुकताच पाहायला मिळाला. प्री-वेडिंग पार्टी ङ्गाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणं आणि त्यासाठी निमंत्रण मिळणं, यातून संबंधितांचा आर्थिक, सामाजिक स्तर लक्षात यावा; परंतु पार्टीत नशापान केल्यानंतर जे घडलं, ते रस्तोरस्ती रोज दिसणार्या नशेबाजांच्या धिंगाण्यापेक्षा भयानक होतं.
या घटनेचं हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसणारं दृश्य अशा सर्व लब्धप्रतिष्ठित व्यक्तींनी आवर्जून पाहावं आणि ‘काय टाळावे,’ याची यादी बनवून एक ‘आदर्श पार्टीसंहिता’ तयार करावी, इतकं बोलकं आहे. पार्टीला आलेल्यांमध्ये बडे व्यावसायिक, व्यापार्यांचा समावेश होता. त्यातील दोन तरुणांमध्ये हॉटेलच्या टेरेसवर कोणत्यातरी कारणावरून वादावादी झाली. त्यातल्या एकानं त्याच्या वडिलांना तिथं बोलावून घेतलं. वडील टेरेसवर आल्यानंतरचा घटनाक्रम असाः त्याच्या मुलाचा ज्या तरुणाशी वाद झाला, तो मित्राच्या वडिलांच्या पावलांना स्पर्श करताना दिसतो. कदाचित त्याने ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांना अभिवादन केलं असेल किंवा आपली चूक झाली म्हणून माफी मागितली असेल, पण व्यर्थ..!
दुसर्याच क्षणी तो पिता मुलाच्या मित्राच्या कानशिलात भडकावताना दिसतो. अत्यंत आक्रमकपणे त्याच्यावर हल्ला करून त्याला फटके मारत राहतो. ते दोघे टेरेसच्या भिंतीजवळ येताच तो पिता मुलाच्या मित्राला टेरेसवरून सरळ खाली ढकलून देतो. विशेष म्हणजे, बहुधा तोही नशेत असल्यामुळे किंवा संतापाचा अतिरेक झाल्यामुळे त्याचाही तोल जातो. टेरेसवरून तो खाली पडणार, तोच त्याला दोघेजण सावरतात. परंतु सावरणार्या व्यक्तीवरच तो संतप्त पिता हल्ला चढवतो आणि त्याला बडवू लागतो. बराच वेळ ही झटापट झाल्यावर त्याला कसंबसं शांत केलं जातं. घडलेल्या अनर्थाची कल्पना दिली जाते. पडलेल्या तरुणाची अवस्था त्याला दाखवली जाते.
ती वेळ साधून त्याच्या तावडीत सापडलेला दुसरा तरुण आपली सुटका करून घेतो. तरीही तो पिता जाता-जाता त्याच्यावर हात चालवतोच. हे संपूर्ण ङ्गुटेज एक मिनिट आणि 29 सेकंदांचं आहे. मित्रांमधील वादावादी तर खूप आधी सुरू झालेली असणार. एवढ्या वेळात हॉटेलचे तथाकथित बाउन्सर वगैरे कुठे होते, असाही प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. हा तंटा एवढा वाढेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाकडून कोणताही हस्तक्षेप कसा झाला नाही?
एरवी एखादा ‘डाउनमार्केट’ माणूस हॉटेलच्या आवारात जरी दिसला, तरी धावून जाणारी हॉटेलची सिक्युरिटी अशा वेळी काय करत असते? पार्टीच्या धुंद आणि कुंद वातावरणात, मिणमिणत्या दिव्यांच्या मंद प्रकाशात एकमेकांची उणीधुणी काढणं आणि त्यावरून होणारे वाद काही नवे नाहीत. किंबहुना जे दिवसा बोलता येत नाही, ते रात्री उकरून काढणार्यांची एक स्वतंत्र कॅटेगरी आहे. अशा वेळी एखाद्याने जिव्हारी लागणारे शब्द वापरले तर होणारा उद्रेक ‘क्लास’ पाहत नाही. उलट प्रतिष्ठा जपतानाच प्रतिष्ठा गमावून बसतो.