व्यक्तिमत्व विकारांविषयी आपण जाणून घेत आहोत. मागील भागामध्ये क्लस्टर ए मध्ये येणाऱ्या व्यक्तिमत्व विकारांविषयी आपण जाणून घेतले. आज आपण क्लस्टर बी मध्ये येणाऱ्या व्यक्तिमत्व विकारांविषयी जाणून घेणार आहोत.
क्लस्टर बी : यामध्ये येणाऱ्या प्रकारातील व्यक्ती या भावनिक आणि आवेशपूर्ण असतात. या व्यक्ती कशा वागतील याचा अंदाज बांधता येत नाही. यांचे वर्तन नाटकीय स्वरूपाचे असते. याचे एकूण चार प्रकार पडतात.
अ. अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Antisocial Personality Disorder)
अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणारे रुग्ण हे आपल्या कामाव्यतिरिक्त दुसर्यांच्या कामामध्ये छेडछाड करुन त्यांच्याशी वाईट वागतात. समाजामध्ये रूढ असणाऱ्या पद्धतीनुसार त्यांना वागता येत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी ते इतरांना त्रास देणं, दुसऱ्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं यासारख्या गोष्टी करतात. हे लोक खोट बोलतात, चोरी करतात किंवा या लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त असते. हे लोक हिंसक, कायदा न पाळणारे, जबाबदारी नं घेणारे असतात.
ब. बाॅर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Borderline Personality Disorder)
बाॅर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार असलेले रुग्ण कोणीही त्यांना सोडून गेले नसले तरी ही स्वतःला एकटे समजतात. या लोकांचा स्वतःवर विश्वास नसतो, दुसऱ्यांवर जास्त अवलंबून असतात. परंतु, सगळ्यांवरच विश्वास ठेवतात असं नाही, एखादीच व्यक्ती त्यांच्या जवळची असते. अशा लोकांना स्ट्रेस भरपूर प्रमाणामध्ये येत असतो आणि त्यावर मात करायला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. यांना पॅरानाॅइयाचा (Paranoia) त्रास देखील होऊ शकतो. या लोकांना असुरक्षित सेक्स करणे, प्रमाणाबाहेर दारु पिणे किंवा जुगार खेळणे अशी आवेशपूर्ण कामे करायला खूप जास्त आनंद मिळतो.
क. हिस्टिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Histrionic Personality Disorder)
हिस्टिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये व्यक्ती सतत इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सेंटर ऑफ अट्रॅक्शन असावं असं त्यांना वाटतं. नाट्यमय किंवा लैंगिक उत्तेजन दाखवून इतरांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. असे लोक लगेच दुसर्यांच्या प्रभावाखाली येऊ शकतात. याशिवाय स्वतःबाबत टीका करणार्या किंवा स्वतःच्या मताशी असहमती दर्शवणार्या लोकांसोबत वावरताना या लोकांना खूप त्रास होतो. इतरांबरोबर नाते संबंध तयार करण्यात अडचण येते.
ड. नारसीसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Narcissistic Personality Disorder)
नारसीसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार असलेले रुग्ण आपण दुसर्यांच्या तुलनेमध्ये स्वतःला जास्त महत्त्वपूर्ण आहोत असे मानून चालतात. हे लोक सतत आपली बढाई मारत असतात. स्वतःच्या गुणांबाबत, यशस्वी वाटचालाबाबत नेहमी बोलत राहतात. समूहामध्ये आपण आकर्षणाचे केंद्रबिंदू असावे ही अप्रत्यक्ष अपेक्षा हे रुग्ण करत असतात. लोकांकडून सतत प्रशंसा केली जावी अशी या लोकांची इच्छा असते. परंतु इतरांच्या भावभावनांबद्दल या लोकांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना कमी असल्याचे आढळून येते.
या प्रकारातील व्यक्तिमत्व दोष असणाऱ्या रुग्णांबरोबर काम करणे अवघड असते. त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.