आरोग्य विभागालाच ‘हुडहुडी’

महापालिकेची तब्बल 45 टक्‍के पदे रिक्‍त


पुरेसे मनुष्यबळच नसल्याने योजना कुचकामी


सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती होणार तरी कशी?

पुणे – सध्याचे ऋतुमान डासांच्या उत्पत्तीला अत्यंत पोषक असल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य बिघडण्याची वेळ आली असताना दुसरीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग याविषयात मात्र “आजारी’ असल्याची स्थिती आहे.

मलेरिया निर्मूलनासाठी जे मनुष्यबळ आरोग्य विभागाकडे असणे आवश्‍यक आहे ते जवळपास निम्म्याने कमी आहे. तरीही हा गाडा उपलब्ध मनुष्यबळामध्ये सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मलेरिया निर्मूलनासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. जनजागृती आणि अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून तो आटोक्‍यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. पण, तरी या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच नसल्याने या योजना आणि उपाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार कसे? हा मोठा प्रश्‍न आहे.

महापालिकेत नागरी हिवताप निर्मूलन योजनेसाठी 298 मान्य पदे आहेत. त्यातील केवळ 161 पदे भरली असून 137 पदे रिक्त आहेत. याशिवाय राष्ट्रीय हिवताप निर्मूलन योजनेंतर्गत 91 मान्य पदे आहेत. त्यातील केवळ 36 पदे भरली आहेत. अन्य 55 पदे ही रिक्त आहेत. अशीच स्थिती महापालिकेतील पदांचीही आहे. 124 मान्य पदे असून त्यातील केवळ 85 पदेच भरली आहेत अन्य 39 पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे एकूण 513 पदांपैकी 282 भरली असून, 231 पदे रिक्त असल्याचे दिसून आले आहे.

या रिक्त पदांमध्ये डॉक्‍टर तर आहेतच, परंतु मलेरिया सर्व्हेअलन्स इन्स्पेक्‍टर, वस्त्यांमध्ये जाऊन काम करणारे कर्मचारी, बिगारी, मलेरिया रुग्णांची माहिती घेणारे कर्मचारी, डासांची तपासणी करणारे निरीक्षक या सर्वांचा समावेश आहे.

1100 सोसायट्या, आस्थापनांना नोटिसा
विविध सोसायट्या, बंगल्यांचा आवार आणि खासगी आस्थापनांसमोर डेंग्यू, मलेरिया डासांची अंडी आढळल्याने संबंधितांना जागेवर नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत 1,100 नोटिसा देण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

मलेरिया युनिटमध्ये मनुष्यबळ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु सद्यस्थितीत उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे मलेरिया निर्मूलनाचे काम सुरू आहे. मनुष्यबळासंबंधी सेवकवर्ग विभागाकडे मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यावर विचार सुरू आहे. दरम्यान, 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील ग्रामपंचायत आणि अन्य सरकारी विभागातील जे कर्मचारी महापालिकेकडे समावून घेतले आहेत, त्यातील काही मनुष्यबळ आरोग्यविभागाला देण्यासंदर्भातही मागणी करण्यात आली आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, मनपा.

Leave A Reply

Your email address will not be published.