“कृष्णा’च्या कर्मचाऱ्यामुळे गरोदर महिलेला जीवदान

शेणोलीच्या सुधीर कणसे यांचा दुर्मीळ बॉम्बे रक्तगट ठरला देवदूत; जपले माणुसकीचे नाते

कराड – कराडसह सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रुग्णांसाठी वरदान असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डॉक्‍टर्स व कर्मचारी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रूग्णाला चांगली सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्याहीपुढे जाऊन येथील कर्मचारी माणुसकीचे नाते जपण्यासाठीही पुढाकार घेतात.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेली 25 वर्षे कार्यरत असणारे सुधीर निवृत्ती कणसे (रा. शेणोली) यांनी आपल्या रक्तदानातून मुंबईत उपचार घेणाऱ्या एका गरोदर महिलेला जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे सुधीर कणसे यांचे रक्त अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या “बॉम्बे’ रक्तगटाचे असल्याने, ते या महिलेसाठी देवदूतच ठरले आहेत.

मुंबई येथील अंधेरीमध्ये एका खासगी रुग्णालयात हर्षदा सपकाळ या गरोदर महिलेवर उपचार सुरू असताना या महिलेची प्रकृती अचानक बिघडली. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. यावेळी रक्तगटाची तपासणी केली असताना संबंधित महिलेचा रक्तगट “बॉम्बे’ असल्याचे निदर्शनास आले. “बॉम्बे’ हा रक्तगट दुर्मीळ असल्याने या गटाचे रक्त सहसा उपलब्ध होत नाही.

मुंबईत या रक्तगटाचे रक्त कुठेही उपलब्ध नसल्याने रुग्णाचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले होते. शेवटी नातेवाईकांनी सोशल मीडियावर “बॉम्बे’ या दुर्मीळ रक्तगटाच्या रक्तदात्यांनी संपर्क करावा, अशा आशयाची पोस्ट टाकली. हा मॅसेच सोशल मीडियावर व्हायरल होत तासगाव येथील बॉम्बे ब्लडग्रुप संघटनेचे संस्थापक विक्रम यादव यांच्यापर्यंत पोहचला.

त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधत हा मॅसेज “बॉम्बे’ रक्तगट धारकांच्या व्हॉटस्‌ऍप ग्रुपमध्ये टाकताच कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आणि “बॉम्बे’ रक्तगट असणारे सुधीर कणसे यांनी तातडीने कृष्णा हॉस्पिटलच्या रक्तपेढीत रक्तदान केले. रक्‍तपेढीच्या अधिकाऱ्यांनी हे रक्त योग्य त्या प्रक्रियेनंतर बॉम्बे ब्लडग्रुप पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. यामुळे गरोदर महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.

काय आहे नेमका “बॉम्बे’ ब्लडग्रुप?
साधारणपणे ए, बी, एबी आणि ओ हे रक्तगट सर्वांना माहिती आहे. पण याव्यतिरिक्त “बॉम्बे’ या नावाचा स्वतंत्र रक्तगट असून, त्याचा शोध 1952 साली डॉ. भेंडे, डॉ. भाटिया आणि डॉ. देशपांडे या तिघांनी लावला. हा रक्तगट अत्यंत दुर्मीळ असून या गटाचे रक्तदातेही कमी प्रमाणात आढळतात. या रक्तगटाच्या लोकांचे रक्त प्रारंभी “ओ’ रक्तगटासारखे भासते. पण अधिक तपासणी केली असता ते “बॉम्बे’ असल्याचे आढळते. कृष्णा हॉस्पिटलने केलेल्या तपासणीत “बॉम्बे’ रक्तगटाचे काही दुर्मीळ रक्तदाते आढळले असून, गरजू रुग्णांना या गटाचे रक्त उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)