स्वच्छ सर्वेक्षणात कराड पालिका पदाधिकाऱ्यांचा गौरव

पुढील वर्षी 500 कोटींची बक्षिसे देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा 

कराड – स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील नगरपालिकांना सुमारे 500 कोटी रुपयांची बक्षिसे पुढील वर्षी राज्य शासनामार्फत देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. तसेच ओडीएफ थ्री स्टार मानांकन होणाऱ्या शहरांना यापुढील काळात प्राधान्याने निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 सालच्या स्पर्धेत देशपातळीवर यश मिळवणाऱ्या महापालिका, नगरपालिकांचा सत्कार मुंबईत करण्यात आला.

एकूण 39 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात कराड नगरपालिकेस 2018 मध्ये 25 वा 2019 मध्ये नॉन अमृत शहरांत राष्ट्रीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवल्याबद्दल गौरवण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, कोरेगाव या नगरपालिकानाही स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 19 मधील यशाबद्दल गौरवण्यात आले. या पालिकेच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्मिता हुलवान तसेच मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगर विकास प्रधान सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, नगरपरिषद प्रशासन एस. मुथ्थु कृष्णन यांची उपस्थिती होती.

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील शहरानी देशात अव्वल कामगिरी केली आहे. 2020 मध्ये याही पेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नगरपालिकांना मिळणाऱ्या निधीशिवाय इतर पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले तसेच पुढील वर्षी 3 स्टार मानांकन मिळवणाऱ्या नगरपालिकानाच प्राधान्याने निधी देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2014 पूर्वी नागरीकरणांकडे शासनाने लक्ष न दिल्याने शहरे बकाल झाली होती. मात्र आमच्या सरकारने नागरीकरण ही संधी म्हणून हे आव्हान स्वीकारले त्यामुळे आज राज्याच्या शहरी भागात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. 2017 साली महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा महामहीम राष्ट्रपतींनी केली होती. त्यानंतर सरकारने घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन याला याला प्राधान्य दिले आहे. नगर विकासच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी शासन व नगरपालिका यांच्यात समन्वय साधून चांगली कामगिरी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)