पुणे – हडपसर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आबासाहेब उर्फ दत्तात्रय धोंडो मगर यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. नोबेल हॉस्पिटल, हडपसर येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पुणे महानगरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. 5 जून 1931 रोजी जन्मलेल्या आबासाहेब मगर यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधून 1956 साली आपली स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी संपादन केली होती. आबासाहेब मगर हे मगरपट्टा सिटी समुहाचे संस्थापक संचालक, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे संचालक, मराठा शिक्षण प्रसारक मंडळीचे ते आजीव सदस्य होते.
कराड अर्बन बॅंकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच पुणे डिस्ट्रिक एज्युकेशन असोसिएशनचे ते खंबीर पाठीराखे होते. आबासाहेब मगर हे “मगरपट्टा टाऊनशिप’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांचे वडिल आणि स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांचे ते छोटे बंधू होत. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, दोन पुतणे, पुतणी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
समाजकार्यात सक्रिय सहभाग
आबासाहेब मगर यांची मगरपट्टा परिसरात एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख होती. अण्णासाहेब यांच्यानंतर काही काळ राजकीय व सामाजिक कार्यातही आबासाहेब यांचा सक्रिय सहभाग होता. हडपसर परिसरामध्ये शेती, उद्योग व्यवसायाला चालना देत आबासाहेब मगर यांनी सतीश मगर यांना मगरपट्टा टाऊनशिप निर्माण करण्यामध्ये मोठा पाठिंबा दिला.