सरकारनं आठवले, जानकार, मेटे यांची अवस्था वाईट करून ठेवली- अजित पवार

इंदापूर: शरद पवार यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख करून दिली. ते मागासवर्गीय समाजाचे मोठे नेते आहेत. आज, त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे! महादेव जानकार, विनायक मेटे सगळ्यांचीच स्थिती या फडणवीस सरकारनं वाईट करून ठेवली असल्याचे अजित पवार म्हणाले, ते इंदापूर तालुक्यातल्या बावड्यामध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आज, इंदापूरमधल्या कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याची आर्थिक परिस्थिती काय आहे ? माहिती अधिकाराखाली त्याची माहिती घ्या. कारखान्यावर ६ लाख १५ हजार ४६१ रुपयांचं कर्ज आहे. नीरा-भीमा कारखान्याची माहिती घ्या. यासकट विजय साखर कारखान्याची अवस्था वाईट आहे.

या सरकारनं ‘मागेल त्याला शेततळं’ ही योजना आणली. त्यावेळी ही योजना होऊ शकत नाही,असं स्पष्टपणे मी भरल्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं. ते करणारच म्हणाले. आता काय अवस्था आहे?मागेल त्याला शेततळं मिळत नाही. तुटपुंजे पैसे हातावर टेकवतात. शेततळी कशी बनवतात, हे यांना काय कळणार, असे पवार म्हणाले.
सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना महिना ५०० रु. देण्याचं आश्वासन या सरकारनं दिलं होतं. सुरुवातीचे ४ महिने काहींना २ हजार रु. मिळाले. आता म्हणतात, आम्हाला मत द्या, नाहीतर आम्ही दिलेले पैसे परत करा. ही अशी यांची शेतकऱ्यांप्रती वागणूक! आम्ही कधी योजनेंतर्गत दिलेल्या सेवेचा मोबदला मागितला नसल्याचे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.