दहा रुपयांच्या नाण्यासाठी नकारघंटा

शिरूर तालुक्‍यातील चित्र : व्यावसायिक, विक्रेत्यांची गोची

शेरखान शेख

शिक्रापूर- काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अनेक गैरसमज व अफवा पसरलेल्या असताना दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास सर्व नागरिक नकार देत होते. परंतु दहा रुपयांचे नाणे चलनात सुरू असताना ग्रामीण भागात दहा रुपयांच्या नाण्याला नागरिकांकडून आजही नकारघंटा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी दहा रुपयांचे नाणे चलनात आल्यानंतर अनेकांनी छंद म्हणून शेकडो नाण्यांचा संग्रह केला होता. अनेक व्यापारी, नागरिक व व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे बाजूला ठेवून बचत म्हणून संग्रह करत होते. परंतु अचानक सोशल मीडियावर दहा रुपयांचे चलनातून बंद, दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यात बॅंकांचा नकार तसेच दहा रुपयांचे नाणे बंद होणार, अशा अफवांना पेव आले होते. त्यावेळी अनेकांनी संग्रह केलेले व जपून ठेवलेले शेकडो नाणे बाहेर काढत चलनात व बॅंकेमध्ये भरण्यास सुरवात केली. यावेळी सर्व बॅंकांमध्ये दहा रुपयांच्या नाण्यांची संख्या वाढू लागली तर काही बॅंकेमध्ये नाणी मोजण्यासाठी काही शुल्क आकारण्यास सुरूवात झाली होती.

यावेळी अनेक बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार दहांची नाणी चलनातून बंद केले नसून नाणी सुरू असल्याबाबत फलक लावले होते. अनेक ठिकाणी नागरिक व बॅंक अधिकाऱ्यांमध्ये वाद देखील झालेले होते. काही ठिकाणी कमी किमतीत दहा रुपयांची नाणी स्वीकारणाऱ्यांची टोळी निर्माण झाली होती, तर असे सर्व प्रकार सुरू असताना अचानक पाच रुपयांच्या नाण्यांबाबत अफवा पसरू लागलेल्या होत्या. त्यामुळे लहान, मोठ्या व्यावसायीकांना याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला होता. तर सध्या बाजारपेठेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहा रुपयांची नाणी गोळा झालेली आहेत. नागरिक, व्यवसायिक व ग्राहकांनी दहा रुपयांच्या नाण्यांबाबत कोणतीही भीती मनात न ठेवता सदर नाणी स्वीकारणे गरजेचे झाले आहे.

  • ग्राहक नाणे घेत नाही
    शिक्रापूर येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेल सागर चायनीजचे संचालक अशपाक मोमीन म्हणाले की, ग्राहक आल्यानंतर आम्हाला दहा रुपयांचे नाणे देतात. ते आम्ही स्वीकारतो. परंतु आम्ही ग्राहकांना दहा रुपयांचे नाणे देत असताना ग्राहक दहा रुपयांचे नाणे घेतच नाही. त्यामुळे याबाबत ग्राहक व नागरिकांसाठी योग्य माहिती प्रसारित करणे गरजेचे आहे.
  • नोटाबंदीमुळे नागरिकांच्या मनात भीती – गुरुदास चंद्रावळे ( उद्योजक )
    उद्योजक गुरुदास चंद्रावळे म्हणाले की, दि.8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानकपणे पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा निर्णय देण्यात आला. त्यावेळी अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेकांना भुर्दंड सोसावा लागला होता. त्यामुळे दहा रुपयांच्या नाण्यांबाबतची भीती नागरिकांच्या मनात घर करून राहिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.