गोवाहटी : आसाममधील पानबारी अभयारण्याच्या परिसरातून स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या भागात करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान हा शस्त्रसाठा उघड झाला आहे. विभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चिरांग पोलिस, लष्कराच्या 5 गढवाल रायफल्स आणि सशस्त्र सीमा बलच्या 54 व्या बटालियनच्या संयुक्त तपास पथकाने अभयारण्यातील गाब्रुखुंदा भागात ही शोधमोहीम राबवली होती. पानबारी अभयारण्यात उत्तरेकडे 18 किलोमीटर आतमध्ये हा शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आला होता.
गोपनीय सूत्रांच्या आधारे आणि लष्कराच्या उच्च प्रशिक्षित श्वानपथकाच्या आधारे या शस्त्रसाठ्याचा शोध घेतला गेला. काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 5.30 वाजेपर्यंत संशयास्पद अनेक ठिकाणी खोदकाम करून ही शस्त्रे शोधून काढण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान काही संशयास्पद पदार्थ असलेली 8 पाकिटेही हस्तगत करण्यात आली. यामध्ये 20 रायफली, 56 एके सिरीजची 7.64 ऍम्युनिएशन, 20 स्नायपर, 83 काट्रेजेस, 4 पिस्तुल मॅगझीन, 17 किलो स्फोटके आणि 2 अतिरिक्त बॅटरी असलेला रेडिओ सेट जप्त करण्यात आला.