शिमला – हिमाचल प्रदेशात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या राज्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत होत असते. आम आदमी पक्षाने मात्र यंदा गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशातही जोर लावला असल्यामुळे राज्यात काय बदलणार याचा कानोसा काही जनमत चाचण्यांमध्ये घेण्यात आला.
मात्र 74 टक्के लोकांनी आप या लढतीतच नसल्याचा धक्कादायक खुलासा केला असल्याचे समोर आले आहे. केवळ 26 टक्के लोकांना आपही भाजप आणि कॉंग्रेसबरोबर लढतीत आहे असे वाटते आहे. दरम्यान, या राज्यात भाजप आणि कॉंग्रेसची आळीपाळीने सत्ता आली आहे. मात्र उत्तराखंडप्रमाणे सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करून आम्ही इतिहास रचणार आहोत असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
तसेच विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल व आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली असल्याचेही भाजपचे म्हणणे आहे. त्यावर लोकांचा कौल घेण्यात आला. म्हणजे मोदींच्या नावावर मतदान होणार क स्थानिक विषयांवर असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला. तेव्हा 43 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या नावावरच मतदान होणार असल्याचे नमूद केले. तर 57 टक्के लोकांनी मात्र स्थानिक विषय महत्वाचे असतील अशी भूमिका मांडली.