सेऊल – दक्षिण कोरियाच्या मध्य भागातील एका कृषी क्षेत्राला आज 4.1 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. मात्र या भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या भागातील गोयसान भागाला या वर्षभरात आतापर्यंत 61 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या धक्क्यांपैकी आता बसलेला भूकंपाचा धक्का सर्वाधिक तीव्र होता. या धक्क्यामुळे घरातील वस्तू जमिनीवर पडल्या. तर खिडक्यांची काचेची तावदानेही थडाथडा वाजायला लागली होती. काही ठिकाणी काचेची तावदाने फुटल्याचेही उदाहरण आहे.
भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिकांनी आपत्कालिन यंत्रणेला फोन केल्याची 140 ठिकाणी नोंद झाली आहे. मध्य उत्तरेकडील चुंगचौंग प्रांतातील नागरिकांमध्ये बूकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. राजधानी सेऊलच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र भूकंपामुळे कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.