अहमदाबाद – देशभरात विस्तारण्यासाठी प्रयत्नशील असणारा आम आदमी पक्ष (आप) आता मिशन गुजरात हाती घेणार आहे. गुजरातमध्ये सत्तारूढ भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनण्याचे लक्ष्य आपने समोर ठेवले आहे.
उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या. मणिपूर वगळता इतर चार राज्यांच्या निवडणूक रणांगणात आप ताकदीने उतरला. त्या पक्षाकडे पंजाबमधील सत्तेचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्या निवडणुकांसाठी होणाऱ्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला आपचा फोकस आता गुजरात विधानसभा निवडणुकीवर असल्याचे सूचित झाले. गुजरातमधील निवडणूक चालू वर्षीच्या अखेरीस होईल.
आपचे गुजरात प्रदेश प्रवक्ते योगेश पटेल यांनी बुधवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पक्षाची भूमिका मांडली. गुजरातमधील जनता भाजपच्या 27 वर्षांच्या गैरकारभाराला विटली आहे. जनतेने 27 वर्षे कॉंग्रेसलाही नाकारले. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी आप ठरेल, असा दावा त्यांनी केला.