नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन हा न्ययालयात शरणागती स्वीकारण्यासाठी पोहोचताच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे विभागाने त्यांना अटक केली. न्यायालयाने या पुर्वी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
गुप्तचर खात्यातील कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात हुसेनवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गुप्तचर खात्यातील अधिकारी अंकित शर्मा (वय 26) यांचा मृतदेह चांदबाग भागात हुसेन यांच्या घरा शेजारी नाल्यात सापडला होता. न्यालयात शरणागती स्वीकारायला निघण्याआधी त्याने दूरचित्रवाणी वाहिन्यांना मुलाखत देऊन आपण शरणागती स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. माझ्या अल्लाला माहित आहे मी दोषी नाही, असे तो म्हणाला.
त्याच्यावर शर्मा यांच्या कुटुंबियांनी आरोप केल्यानंतर त्याला आपमधून काढून टाकण्यात आले. शर्मा कुटुंबीय म्हणाले होते, हुसेन याने चिथावलेल्या जमावानेच अंकित यांची हत्या केली. पोलिसांनीच हुसेन आणि त्याच्या कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढल्याचा आरोप समाजमाध्यमांत होऊ लागल्यानंतर ते फेटाळणारे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. हुसेन हा त्याच्या कुटुंबियांसह फरार झाला असल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
हुसेन त्याच्या कुटुंबियांसह फरार झाला असून त्याने मोबाईल बंद ठेवला आहे. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेश सीमेजवळ सापडले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.