दुबई – भारताच्या महिला क्रिकेट संघाची आघाडीची गुणवान फलंदाज शफाली वर्मा हिने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अशी कामगिरी करणारी शफाली भारताची पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.
सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत क्रमवारीत प्रगती केली आहे. या स्पर्धेत शफालीने 4 सामन्यांतून 161 धावा केल्या आहेत. तिच्या प्रत्येक खेळीत तिने प्रतिस्पर्धी गोलंदाजीचा पालापाचोळा करताना स्पर्धेत आतापर्यंत 18 चौकार व 9 षटकारांची आतषबाजी केली आहे. तिने आपल्या खेळीने क्रमवारीत 19 स्थानांनी झेप घेत अव्वल स्थान मिळविले आहे. शफालीसह भारताची आणखी एक अव्वल फलंदाज स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स यांचा पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे.
.@TheShafaliVerma becomes top-ranked batter in the latest ICC Women’s T20I Player Rankings. ?? #TeamIndia
More details ?
— BCCI Women (@BCCIWomen) March 4, 2020
कारकिर्दीत आतापर्यंत केवळ 18 टी-20 सामने खेळताना शफालीने ही कामगिरी केली आहे. सर्वात कमी वयात क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली एकमेव फलंदाज बनली आहे. या क्रमवारीत स्मृती मानधना 6 व्या तर, जेमिमा 9 व्या स्थानावर आहेत.