कोथरूड, दि. 19 (प्रतिनिधी) -मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक करण्याच्या मोहिमेमध्ये कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी केले आहे.
राज्यात मतदारांच्या मतदार ओळखपत्राला आधारकार्डची नोंदणी करण्याची मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. आधार क्रमांक मिळविण्याचा हेतू मतदारांच्या यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे, अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.
एसएनडीटी महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांना तहसीलदार शेवाळे यांनी व्होटर हेल्पलाइन ऍपच्या माध्यमातून मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक करण्याची समजाऊन सांगितली. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदासंघांत किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघांत व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आधार लिंक करण्याचा प्रमुखे उद्देश असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.