मेढा – मेढा येथील वेण्णा बसस्थानकाजवळ व वेण्णा चौकाच्या पुढे मेढा- केळघर रस्त्याच्या डाव्या बाजूला रात्रीच्या दरम्यान राम बाबू पवार (वय ३० ते ३५ वर्ष ) यांचा मृत्यु झाला असून तो खूनच झाल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांना आहे. या मृत्यूची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून हा मृत्यू की खून याबाबत पोलिस तपास यंत्रणा गतिमान झाली आहे .
याबाबत घटनास्थळावरून व त्यांच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री मेढ्याचे ग्रामदेवत भैरवनाथाची वार्षिक यात्रा असल्याने देवाचा छबिना व त्यानंतर थिएटरचा तमाशा त्यामुळे मोठी गर्दी असते. रामही यात्रेसाठी रात्री घरून गेला. मात्र, तोआलाच नाही . त्याचा मृत्यू झाल्याचे सकाळी त्याच्या कुटुंबीयांना समजले . ज्या ठिकाणी मृत्यू झाला होता, त्या ठिकाणी रक्ताने माखलेला एक मोठा दगड तसेच तुटलेले प्लायवुडच्या फळीचे दोन तुकडे होते.
त्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिक वाढले असून तो खूनच आहे की काय या दिशेने तपास यंत्रणा सुरु झाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर आले. तातडीने त्यांनी तपास यंत्रणा गतिमान केल्या. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे खराडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून कटुंबीयांना भेट दिली . त्यानंतर तातडीने एक श्वान पथकाची टीम सातारहून दाखल झाली असून त्यामार्फत तपास सुरु झाला आहे.
पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले असून लवकरच तपास यंत्रणेत माहिती उघड होईल, असे सांगितले . दरम्यान, शव विच्छेदनासाठी नेण्यात आले असून म्रुत राम बाबू पवार याच्या मागे दोन मुली, पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.