एका कंपनीतील कामगारास करोनाची लागण…..
कुरकुंभ(प्रतिनिधी) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये काम करणार्या कामगारास करोनाची लागण झाली आहेे, अशी माहीती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
सोमवारी (दि. 25) मुंबई-अंबरनाथ येथून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये हा कामगार आला होता, त्याला कुरकुंभ येथे आल्यानंतर करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला त्याच ठिकाणी (कंपनी मध्ये) आयसोलेट केले होते, मात्र या कामगारास खोकला, श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याला गुरुवारी (दि.28) दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबधीत कामगाराच्या घशातील द्रव पुणे येथील खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी नेले असता शनिवारी (दि. 30) करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे दौंडकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
संबधीत रुग्णावर सध्या दौंड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्यांची देखील करोना विषाणूची तपासणी करण्यात येणार आहे. संबधीत रुग्ण हा कुरकुंभ गावातील तसेच परिसरातील जास्त लोकांच्या संपर्कात आला नसून कुरकुंभ परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी केले आहे.