‘वायसीएम’च्या डॉक्टरांचे स्तुत्य परिश्रम : नवजात बालकांचे “करोना’ रिपोर्ट निगेटिव्ह
पिंपरी (प्रतिनिधी) – “करोना’च्या या संकटकाळात महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) डॉक्टर अथक परिश्रम करुन नागरिकांचे जीव वाचविण्याचे कार्य करत आहेत. “वायसीएम’च्या स्त्री विभागातील डॉक्टर आणि स्टाफने 7 करोना बाधित गर्भवती महिलांवर यशस्वी उपचार केले. दोन गर्भवती महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत.
सर्वांत आनंदाची बाब म्हणजे पूर्ण सतर्कता बाळगत नवजात बालकांना “करोना’पासून दूर ठेवले. एकूण नऊ महिलांपैकी चार महिलांची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली. तसेच करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या 130 गर्भवती महिलांची देखील रुग्णालयात प्रसूती करण्यात आली.
“वायसीएम’ हे समर्पित कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. रुग्णालयामध्ये करोना बाधित चार महिलांची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली. त्यातील एका महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. आई व बाळ दोन्ही सुरक्षित आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहे.
दुसऱ्या गर्भवती महिलेच्या बाबतीत प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर पूर्वीचे सिझेरियनचे टाके निखळून गर्भ पिशवी फाटली असल्याची लक्षणे दिसून आली. त्यामुळे संबंधित महिलेची प्रसूती देखील सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्याचा निर्णय घेऊन आई व बाळ दोघांचाही जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
दोन महिलांची प्रसूती ही नजीकच्या रुग्णालयात झाल्यानंतर करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. इतर तीन महिलांपैकी प्रसूतीपूर्व कालावधीत गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यामध्ये दोन महिलांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर, पाचव्या महिन्यामध्ये एका महिलेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या तीन महिलांपैकी दोघींना डिस्चार्ज देण्यात आला.
सध्या एकीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. करोनासदृश्य लक्षणे असणाऱ्या व तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या 130 महिलांची देखील रुग्णालयात प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर आणि स्टाफने अशा बिकट परिस्थितीत “करोना’चा संसर्ग वाढू न देण्याची पूर्ण काळजी घेतली.
रुग्णालयामध्ये अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महेश आसलकर (कोविड स्त्री रोग विभाग), डॉ. हेमराज नारखेडे, आनंद करळे, स्मिता ठक्करवाड, कुणाल शिंदे, डॉ. सुपे, डॉ. रेणु आदी स्त्री रोग तज्ज्ञांनी उपचार केले. तसेच, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रसाद भानप, बालरोग विभाग प्रमुख, मेडीसीन विभाग प्रमुख व भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख आणि स्त्री रोग विभागात कार्यरत असलेल्या सर्व परिचारिका, मेट्रन यांचे सहकार्य लाभले. वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था चालू झाल्यानंतर येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे निवासी डॉक्टर करोना बाधित रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध आहेत.