वॉशिंग्टन – अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्कोमध्ये उबर राईड दरम्यान चालकाने महिला प्रवाशाला मास्क घालण्यास सांगितले. यावर आरोपी महिलेने चालकाचा मास्क हिसकाऊन घेत फाडला आणि प्रवासात चालकाच्या तोंडावर खोकली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. आता या महिलेला या कृत्यासाठी तब्बल 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. तसेच 3 हजार डॉलर म्हणजे जवळपास 2 लाख 17 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत उबेर कारने प्रवास करणारी एक महिला मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून चालकाच्या तोंडावर खोकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात आरोपी महिला चालकासोबत अपमानजनक वर्तन करत असल्याचेही समोर आले.
संबंधित चालक मुळचा नेपाळमधील रहिवासी असून नोकरीनिमित्ताने तो अमेरिकेत आहे. सध्या युरोपीयन देशांमध्ये आशियातील नागरिकांविरोधात वर्णभेदी शेरेबाजी आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे या व्हिडीओवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अखेर स्थानिक पोलीस प्रशासनाने या महिलेविरोधात गंभीर गुन्हे दाखल केला.