पुणे – शहरात करोनाच्या साथीचा विळखा दिवसें दिवस घट्ट होत असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे करोना चाचणी केंद्र, कोवीड सेंटर, रूग्णांचे ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोन तसेच मास्कच्या कारवाईची जबाबदारी आरोग्य निरिक्षक आणि सहायक आरोग्य निरिक्षकांकडे देण्यात आली आहे.
हे काम दिवसभरात जवळपास दहा ते बारा तास चालत असतानाच; आता स्वच्छ भारत अभियान 2020-21 च्या परिक्षणाचे भूत या कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे दिवसातील तब्बल 18 तासांचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागत असून सर्व कर्मचारी वैतागले आहेत. त्यातही, शहर स्वच्छतेची जबाबदारी पुन्हा याच कर्मचाऱ्यांवर असून आम्ही माणूस नाही का असा सवाल हे कर्मचारी उपस्थित करू लागले आहेत.
शहरात गेल्या महिन्याभरापासून करोनाच्या साथीने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यामुळे, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ आरोग्य निरिक्षकांपासून कनिष्ठ आरोग्य निरिक्षकांपर्यंत सर्वाकडे देण्यात आली आहे. प्रभागात नव्याने सापडणाऱ्या बाधिताच्या क्वारंटाईन, उपचारा पासून निधन होणाऱ्या करोना रूग्नाच्या अंत्यविधी पर्यंतच्या प्रक्रीयामध्ये या कर्मचाऱ्यांना सहभागी व्हावे लागत आहेत, तसेच करोना प्रतिबंधात्मक नियमांची अमंलबजवाणी करण्याची जबाबदारीही यांच्यावरच आहे.
असे असतानाच, शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ भारत अभियान स्पर्धेचे परिक्षण पथक दाखल झाले आहे, हे पथक सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत शहरात कोणत्याही भागात भेट देऊन महापालिकेच्या स्वच्छतेची पाहणी करते त्यातच, मागील वर्षी कसेबसे तीन स्टार शहराचा दर्जा रडतखडत मिळालेल्या महापालिकेने यंदाची पंचतारांकीत दर्जाच्या शहरासाठी अर्ज केला आहे.
त्यामुळे या स्पर्धेचे 300 हून अधिक निकष पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा याच आरोग्य निरिक्षकांवर तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यामुळे, कर्मचारी वैतागले असून या कामामुळे अनेक कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधात्मक लसही घेता आलेली नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली आहे.
शहरात करोनाचे गंभीर संक़ट असून ते वाढतच आहे. हे काम वाढत असतानाच आता आमच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही दिवसातले 18 तास घराबाहेर आहोत. आम्हाला लस घेण्यासही वेळ मिळत नाही, अशा स्थितीत शहर स्वच्छता, करोना प्रतिबंध तसेच अशा स्पर्धांचे कामही आमच्यावर टाकले जात आहे. – एक वरिष्ठ आरोग्य निरिक्षक