पुणे – करोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्हयात वाढत जाणाऱ्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या उपाययोजनाबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी तसेच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी, करोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात.
तसेच करोनाबाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, करोनाबाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वार्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावेत. भविष्यात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनच जास्तीत जास्त बेडची सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.