पुणे – “युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. यातून तरुणांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. सत्ता हातात ठेवायची असेल, तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
युवकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. यात्रेचा उद्घाटन कार्यक्रम मंगळवारी (दि.24) टिळक स्मारक मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार पवार, खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात संघर्ष यात्रेतून झाली आहे. सुमारे पंचेचाळीस दिवसांत 800 किलोमीटर अंतराचा प्रवास यातून होणार आहे. कंत्राटी भरतीचा मुद्दा यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थित करण्यात आला आणि सरकारला त्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा लागला. हे यात्रेचे यश आहे, असे पवार यांनी सांगितले.
विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे. या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ती परिणामकारक ठरेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या यात्रेचा समारोप नागपूर येथे होणार आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, कंत्राटी भरती, पेपरफुटी प्रकरण, नागरी सेवा परीक्षासंदर्भातील निर्णय, बेरोजगारी या प्रमुख मागण्या यात्रेच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. युवकांना संघटीत करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्थांनी भरमसाठ फी घेणे अयोग्य
राज्य शासनाने अनेक धोरणांबाबत निर्णय घेतले. ती धोरणे बघितली, की असे निर्णय सरकारने का घेतले? असा प्रश्न निर्माण होतो. शाळा सुरू आहेत पण शिक्षक दिसत नाही. शैक्षणिक संस्था चालवणारे काही लोक भरमसाठ फी घेतात. ही फी घेणं योग्य नाही. त्यासंदर्भात सरकारने विचार करायला हवा, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.
ताफा अडवण्याचा प्रयत्न
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलकांनी शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रेच्या उद्घाटनानंतर “शरद पवार गो बॅक’चे पोस्टर हातामध्ये घेऊन पवारांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना वेळीच रोखले.