Best Pitch & Ground Award Of IPL 2024 : आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. पण या पराभवादरम्यान सनरायझर्स हैदराबादसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, हैदराबादचे होम ग्राउंड राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी आयपीएल 2024 ची सर्वोत्तम खेळपट्टी (Best Pitch & Ground Award) म्हणून निवडली गेली आहे. या मोसमात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्या होत राहिल्या. याशिवाय गोलंदाजांनाही खेळपट्टीची मदत मिळाली.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळाला ‘हा’ पुरस्कार
मात्र, आता सनरायझर्स हैदराबादचे घरचे मैदान (होम ग्राउंड) असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील (Rajiv Gandhi International Cricket Stadium) मैदान आणि खेळपट्टीला ‘सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदान'(Best Pitch & Ground Award) हा पुरस्कार देण्यात आला आहे. यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळणार आहेत.
यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा प्रवास…
या मोसमात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी उत्कृष्ट होती. सनरायझर्स हैदराबादने 14 सामने खेळले, ज्यात 8 जिंकले, तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादचा संघ 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर-1 खेळला गेला, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले.
राजस्थानचा पराभव करून गाठली अंतिम फेरी , पण..
क्वालिफायर-2 मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादच आमने-सामने होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीत धडक मारण्यात यश आले. मात्र सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी राखून पराभव केला.