शिक्रापूर (प्रतिनिधी) – धानोरे ता. शिरूर येथील एका बड्या उद्योजकाला कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या घरातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी एका जेष्ठाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता याच गावातील एका कंपनी कामगाराला कोरोनाची बाधा होवून त्या कामगाराच्या घरातील आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. या शिवाय आणखी एका कामगारचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
धानोरे या गावाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविलेले असतानाच अचानकपणे गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन येथील एका बड्या उद्योजकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य खबरदारी घेत सदर उद्योजकाच्या घरातील नऊ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता नऊ जणांपैकी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यांनतर सर्व कोरोना बाधितांवर उपचार सुरु असतानाच एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
दरम्यानच्या काळामध्ये धानोरे येथील एका कंपनी कामगाराला कोरोनाची बाधा झाली असता आरोग्य विभागाच्या वतीने सदर कामगाराच्या घरातील नऊ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता नऊ जणांपैकी आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत फक्त एका लहान बालकाचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता नव्याने एकाच घरातील आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर गावातील एका कंपनी कामगाराने कंपनीत वारंवार कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे स्वतःची तपासणी केली असता त्याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
धानोरे गावामध्ये एकामागून एक अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे असून नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी – स्वप्नील झगडे
धानोरे गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ग्रामस्थांना यश आलेले असताना अचानकपणे गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत एका जेष्ठाचा मृत्यू झाला हि खेदाची बाब आहे, मात्र नागरिक व ग्रामस्थांनी योग्य खबरदारी घेत विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे आवाहन पोलीस पाटील स्वप्नील झगडे यांनी केले आहे.