पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती गण-गट रचनेवर आतापर्यंत एकूण 42 हरकती नोंदविण्यात आल्या आहे. या गण-गट रचनेवर हरकती अथवा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदविण्यासाठी बुधवारी (दि.8) शेवटचा दिवस आहे. या हरकतीवर दि. 22 जूनपर्यंत सुनावणी घेऊन, अंतिम गट-गट रचना दि. 27 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद गण-गट रचनेचा प्रारुप आराखडा जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (दि.2) प्रसिद्ध केला. जिल्हा परिषदेसाठी 82 गट तर पंचायत समित्यांसाठी 13 तालुके मिळून 164 गण आहेत. 2017 च्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी सदस्यांची संख्या सातने तर पंचायत समित्यांच्या सदस्यांच्या संख्येत 14 ने वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या या प्रारुप गण – गट रचनेवर नागरिकांना दि. 8 जून 2022 पर्यंत हरकती अथवा सूचना नोंदविता येणार आहे.
प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्त दि.22 जून 2022 पर्यंत गण-गट रचना अंतिम करणार आहे. तर अंतिम गण-गट रचना दि.27 जून 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, दि. 6 जून रोजी दहा हरकती आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 7 जून रोजी 32 हरकती नोंदविण्यात आली आहे.