नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.आईने गेम खेळण्यापासून रोखले होते त्यानंतर मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली. एवढेच नाही तर त्या मुलाने आईच्या मृतदेहाशेजारी चक्क तीन दिवस काढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लखनऊनच्या पीजीआय परिसरात ही घटना घडली आहे. मोबाईल गेम खेळू न देणाऱ्या आईची १६ वर्षीय मुलाने हत्या केली आहे. यानंतर मुलाने आपल्या १० वर्षीय बहिणीला खोलीत बंद केलं आणि आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. तीन दिवस मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. आईचा मृतदेह कुजून त्यातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर मुलाने वडिलांनी फोन केला आणि हत्या झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर चौकशी केली असता मुलगा आपली ४० वर्षीय आई साधना आणि १० वर्षीय बहिणीसोबत राहत होता. मुलाचे वडील लष्कर अधिकारी असून कोलकातामध्ये तैनात आहेत. रविवारी जेव्हा महिलेने आपल्या १६ वर्षीय मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं तेव्हा तो रागावला. यानंतर त्याने वडिलांची परवाना असणारी पिस्तूल घेतली आणि आईच्या डोक्यात गोळी झाडली. महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने पिस्तूल तिथेच बेडवर ठेवलं आणि १० वर्षीय बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद केले होते..
मुलगा तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरातच होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्गंध बाहेर जाऊ नये यासाठी तो वारंवार घरात रुम फ्रेशनर मारत होता. दुर्गंध जास्त पसरु लागल्यानंतर मुलाने मंगळवारी संध्याकाळी वडिलांनी फोन करुन आईच्या हत्येची माहिती दिली. वडिलांनी तात्काळ पोलिसांना फोन करुन सगळा घटनाक्रम सांगितला.
मुलाने पोलिसांना खोटी माहिती देत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांनी सांगितले आहे. इलेक्ट्रिशियन घरी आला होता आणि त्यानेच हत्या केली असे मुलाने पोलिसांना सांगितले होते. पण केवळ अडीच तासांच्या चौकशीनंतर सर्व सत्य समोर आले. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.