पुणे : पुणे जिल्हा परिषद व 13 पंचायत समित्यांच्या प्रारूप आराखड्यावर 150 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 22 हरकती मान्य करण्यात आल्या असून, त्यानुसार गट-गण रचनेमध्ये बदल करून ही रचना जिल्हाधिकारी यांनी सोमवारी प्रसिद्ध केली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी गट आणि गणांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या जुन्या रचनेप्रमाणे 75 गट, तर पंचायत समितीचे 150 गण अस्तित्वात होते. नव्या रचनेनुसार 82 गटांची निर्मिती झाली, तर 164 गण तयार झाले. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर 150 हरकती दाखल प्राप्त झाल्या. त्यावर 16 जून रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेऊन 22 हरकती स्वीकारल्या.
आयोगाच्या निकषानुसार 82 पैकी अनुसूचित जातीसाठी 8 गट, तर अनुसूचित जमातींसाठी सहा गट आरक्षित होणार आहेत. गटांची प्रभाग रचना अंतिम झाली असून, आता आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.