उत्तम पिंगळे
परवा प्राध्यापक विसरभोळेंच्या घरी गेलो तर सर देवपूजा करत होते. समोरच कागद होता त्यावर ए टू झेड राजकारण लिहिले होते…
ए – एबी फॉर्म. पक्षाने अधिकृत उमेदवारास दिलेले पत्र.
बी – बाय इलेक्शन. म्हणजे पोट निवडणूक, निवडलेल्या सदस्यांचे निधन, वा राजीनामा देणे.
सी – करप्शन. अलीकडील राजकारणात याचा खूप मोठा संबंध असतो.
डी – डबल सीट. एक उमेदवार दोन ठिकाणाहून एकाच वेळी निवडणूक लढणे. एकीकडे पराभवाचा संकेत मिळत असल्यावर दुसरीकडे लोकआग्रहास्तव लढणेही सांगता येते.
ई – ईव्हीएम. यामध्ये आपण दिलेले मत जमा होते व मग मोजणीही होते. राजकीय पक्ष त्यास हेराफेरी करणारा व निपक्षपाती असे सोयीस्कर दोन्ही अर्थ लावतात.
एफ – फॉर्म. निवडणुकीचा अर्ज. यात उमेदवाराने सत्य माहिती देण्याची अपेक्षा असते.
जी – गव्हर्मेंट. सरकार बहुमताच्या आकड्याने स्थापन होते. मग यात मोठा पक्षच हवा असे नाही तर पाठिंबा देणारे बंडखोर, फितूरही चालतात.
एच – ऑनेस्टी. प्रामाणिकपणा. आजच्या निवडणुकांत अभावानेच आढळत असतो.
आय – इंडिपेंडंट. अपक्ष निवडून आलेले किंगमेकर होऊ शकतात.
जे – जॉब निर्माण करू असे आश्वासन.
के – किंगमेकर. अपक्ष संधिसाधूंचा कंपू.
एल – लोकपाल. सर्वच पक्ष त्याला नेमू असे म्हणत असतानाच कोणीही पुढाकार घेत नाही.
एम – मनी. सर्व राजकारण ढवळून काढणारा. होते त्याचे नव्हते व नव्हते त्याचे होते करणारा व पुराव्यासह न सापडणारा पदार्थ.
एन – नोटा. नकाराधिकार. कोणताही उमेदवार पसंत नसेल तर हे बटण दाबता येते.
ओ – ऑफिस ऑफ प्रॉफिट. सरकारी पद धारणा केलेले निवडणूक लढवू शकत नाहीत. सध्या दिल्लीत यावरून गोंधळ सुरू आहे.
पी – पीपल. जनता जी स्वत: लोकांचे लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य आणते.
क्यू – क्वालिफिकेशन. यात शालेय शिक्षण सोडून इतर वय अधिवास नागरिकत्व याला महत्त्व दिले जाते.
आर – रिकाउंटींग. पुनर्मोजणी. आता ईव्हीएममुळे इतिहास जमा झालेली आहे. पण पाच टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी होते.
एस – सेक्युलर. धर्मनिरपेक्ष. सर्वच राजकीय पक्षांचा आवडता शब्द. हा पुढे ठेवून मग कसेही वागता येते.
टी – टर्म. मुदत. लोकसभा व विधानसभेची पाच वर्षे.
यू – युनायटेड. संयुक्त वा एकजूट पक्षांच्या वा गटात होते बहुतेक वेळा ती कागदोपत्रीच असते.
व्ही – वोट. मत. लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा घटक हे मिळणे व त्यासाठी कित्येक वेळेला लोकांना मतदारराजा संबोधले जाते.
डब्लू – विन. विजय शेवटी किती मतांनी कसा मिळाला यापेक्षा विजय मिळवला हे महत्त्वाचे असते.
एक्स – झेरॉक्स. नक्कल. राजकारणात कुणीही कुणाची कधी करेल सांगता येत नाही. पण बहुतेक वेळेला काकांची नक्कल पुतणे करतात.
वाय – येस अँड नो. सभागृहातील मत देताना येस व नो विचारणा केली जाते नंतर त्याची मोजणी होऊन ठराव मंजूर वा नामंजूर होतो.
झेड – झिंदावाद. अशा घोषणा निवडणूक पूर्व व निवडून आल्यावर दुमदुमतात मग मतदार राजा पुढील पाच वर्षांकरता मुर्दाबाद राहतो.