पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस

नवी दिल्ली – देशातील बांधकाम क्षेत्राचे देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 15 टक्क्‌यांचे योगदान असते. परंतु गेल्या काही काळापासून या क्षेत्रात मंदी आल्याने या क्षेत्राचे योगदान घटले आहे. मात्र, मंदीतही हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे जीडीपीतील योगदान मोठ्या प्रमाणावर वाढत असून आगामी दहा वर्षांत जीडीपीमध्ये 492 अब्ज डॉलर्सपर्यंत या क्षेत्राचे योगदान जाईल, असा अहवाल आयबीईएफने दिला आहे. पर्यटन क्षेत्राचा वाढता विकास पाहता वर्ष 2022 पर्यंत या क्षेत्रात 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल, असा अहवाल मेराकी संस्थेने दिला आहे.

अमेरिकेत “हाउडी मोदी’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीयांना आवाहन केले की, त्यांनी पाच बिगर भारतीय अमेरिकी कुटुंबांना भारतात पर्यटनासाठी घेऊन यावे. यामुळे देशातील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या काही काळापासून देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढत असून पुढील दहा वर्षात त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने सध्या या क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले असून देशातील युनेस्को घोषित 36 जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी दोन ते चार तारांकित हॉटेल्स उभारणाऱ्या डेव्हलपर्सना पाच वर्षांसाठी करात सवलत जाहीर केली आहे. या ठिकाणांमध्ये दिल्ली व मुंबई ही महानगरे मात्र वगळण्यात आली आहेत. हॉस्पिटॅलिटी क्षेत्र दुहेरी वाढीचा मार्ग साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पर्यटन क्षेत्रापलीकडे जात आपला देश वैद्यकीय पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत असून त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या तसेच हॉस्पिटॅलिटीशी संबंधित पायाभूत सुविधांची गरज वाढली आहे. या सर्वांमुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा बहुप्रतीक्षित विकास होईल, असा अंदाज आहे. रिऍलिटी सल्लागार संस्था मेराकीनुसार पर्यटकांची वाढती संख्या पाहून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील वार्षिक गुंतवणुकीत वाढ होणे अपेक्षित आहे.

आयबीईएफच्या माहिती नुसार प्रवास आणि पर्यटनासह हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे देशाच्या जीडीपीतले योगदान 2017 मधील 234 अब्ज डॉलर्सवरून 2028 पर्यंत 492 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज असून देशांच्या यादीत भारताचा सातवा क्रमांक लागतो. हे क्षेत्र स्थावर मालमत्ता क्षेत्राप्रमाणे परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे आणि देशासाठी परकीय विनिमय योगदान देणारे तिसरे सर्वात मोठे क्षेत्र ठरते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.