राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक; बेताल वक्तव्याचा निषेध करत प्रतिमेला मारले जोडे
सातारा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जोरदार निषेध करण्यात आला. पोवई नाका येथे पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारुन होळी करण्यात आली. तर राष्ट्रवादी कार्यालयासमोर पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पडळकर यांनी बुधवारी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलने करुन निषेध करण्यात येत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, दीपक पवार, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यालय ते पोवई नाका अशी रॅली काढत घोषणाबाजी करण्यात आली. रॅली पोवईनाक्यावर येईपर्यंत पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांकडून ताब्यात घेतला. यावेळी पोवई नाक्यावर पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारुन प्रतिमेचे दहन करण्यात आले. “गोप्या तुझे हाय काय, खाली मुंडी वर पाय आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
“जोडे मारो’ आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. या आंदोलनात अतुल शिंदे, शफिक शेख, राजेंद्र लावंघरे, गोरख नलवडे, जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, कुसुमताई भोसले, स्मिता देशमुख, पूजा काळे, नागेश साळुंखे, पार्थ पोळके, सनी शिर्के, प्रतिक कदम, गिरीश फडतरे, वैभव मोरे, महेश जाधव, विकास अवघडे, शुभम साळुंके, मंगेश ढाणे, प्रथमेश बाबर, सागर जगदाळे, राहुल साबळे, अमर माने, स्वप्निल डोंबे, सुरेश गायकवाड, वनराज कदम, प्रकाश येवले, पांडुरंग भोसले, नलिनी जाधव, सागर जगताप आदी सहभागी झाले. दरम्यान, मानसिंगराव जगदाळे, राजेंद्र लावंघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवनासमोरील रस्त्यावर गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी केली.
अन्यथा जीभ हासडू – सुनील माने
शरद पवार यांच्याबद्दल राज्यातच नव्हे तर देशवासियांमध्ये आत्मियता आहे. कोणीही येईल आणि आमच्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर बोलणार असेल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही. भाजपने अशा लोकांना समज देण्याची गरज असून असे प्रकार पुन्हा घडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल. बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांनी माफी मागावी, पुन्हा अशी वक्तव्य केल्यास त्यांची जीभ हासडू, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी यावेळी दिला.