पाटण (प्रतिनिधी) – तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनेकवेळा सांगून किंवा नोटिसा पाठवून देखील पंचायत समितीच्या मासिक बैठकांना हजर राहत नाहीत. त्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी पंचायत समितीच्या बैठकांमध्ये केल्या जातात. तसेच त्यांनी नेमलेले ठेकेदार सध्या पावसाळ्यात सुद्धा रस्त्याच्या कामांचे डांबरीकरण करत आहेत याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास यापुढे बांधकाम विभागाविरोधात आंदोलन करू, असा इशारा सभापती राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
राजाभाऊ शेलार यांनी निवेदनात दिलेली माहिती अशी, दि. 16 मार्च रोजी मी पाटण पंचायत समितीसमोर कराड चिपळूण रस्त्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस एल अँड टी कंपनीच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी पाटण ते कोयनानगर या रस्त्यावर पडलेले खड्डे भरून देण्याचे आश्वासन दिले होते.अद्याप त्याबाबत उपाययोजना झालेली नाही.
तसेच ढेबेवाडी विभागातील महिंद गावच्या रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात केल्याच्या तक्रारी या विभागातील पंचायत समिती सदस्यांनी मासिक बैठकीत मांडल्या आहेत. महिंद गावच्या रस्त्याच्या कामाची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर द्यावी अन्यथा सहा जुलै रोजी पुन्हा रास्ता रोको करणार असल्याचा इशारा राजाभाऊ शेलार यांनी दिला आहे.
कार्यालयात जाऊन जाब विचारणार
पाटण तालुक्यातील बहुतांशी रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण आणि उत्तर विभाग व या विभागात येणारे अधिकारी करत असतात. रस्त्याच्या कामाबाबत अनेक गावच्या ग्रामस्थांच्या तक्रारी पाटण पंचायत समितीकडे येत असतात. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी हजर असणे आवश्यक आहे. परंतु हेच अधिकारी जर बोलावूनही येत नसतील आणि मासिक बैठकांना गैरहजर राहत असतील तर आंम्हाला यापुढे यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारावा लागेल असे राजाभाऊ शेलार यांनी पत्रकात म्हटले आहे