विकासनगर येथील विब्स शाळेवर कारवाई

महापालिकेकडून कारवाई : शाळेच्या चार वर्गखोल्या सील

देहूरोड – विकासनगर-किवळे येथील विद्या भुवन (विब्स) इंग्रजी माध्यमिक शाळेत अयोग्य पद्धतीने वह्या, पुस्तके विक्रीसाठी ठेवल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाने गुरुवारी (दि. 25) शाळेच्या चार वर्ग खोल्यांना सील केल्या आहेत.

विकासनगर येथे विब्स इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये वह्या पुस्तकांची विक्री होत असल्याची तसेच त्यासंदर्भातील ऑडिओ क्‍लिप पाठविल्याची तक्रार पालकांनी आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन आणि नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार नगरसेविका खानोलकर यांनी शिक्षण मंडळाकडे दोन दिवसांपूर्वी तक्रारही दाखल केली होती.

शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण मंडळाचे तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक विलास पाटील आणि रवींद्र शिंदे यांनी गुरुवारी शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापिका एस डे, नगरसेविका खानोलकर, मनोज खानोलकर, तुकाराम भोंडवे, रमेशन, दोन पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत वह्या-पुस्तक ठेवलेले चार वर्ग खोल्यांना सील करण्यात आले.

कोविड-19 च्या महामारी संकटात नागरिक हैराण झाले असताना शाळेकडून फी आकारणी करणे तसेच बेकायदेशीररित्या शाळेच्या नावाच्या बॅग, वह्या- पुस्तकांची विक्री हे गैर आहे. याबाबतची तक्रार पालकांनी केली होती.
– श्रीजीत रमेशन, आरटीआय कार्यकर्ते


शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी वह्या, पुस्तके उपलब्ध व्हावी, त्यासाठी विक्रेत्याने शाळेच्या प्रिमायसेसमध्ये स्टॉल लावले आहेत.
– एस.डे., मुख्याध्यापिका


शाळेच्या प्रिमायसेसमध्ये वह्या, पुस्तकांची विक्री करणे गैर आहे. चार वर्गखोल्या सीलही करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.