नवी दिल्ली : “अगर हौसले बुलंद हो और उडणे कि चाहत मजबूत हो तो हर मुश्किल आसान बना देती है…” एक जाहिरातीसाठी वापरण्यात आलेला हा डायलॉग आहे. मात्र हे डायलॉग एका मुलाने खरोखरच प्रत्यक्षात उतरवले असून यातून त्याने यशाचे शिखर गाठले आहे.
मध्यप्रदेशातल्या नीमच जिल्ह्यातल्या मनासा गावातील एका तरुणाने वडिलांसोबत पाणीपुरी विकण्याचे काम करून आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर भारतीय हवाई दलात वैमानिक या पदावर नोकरी मिळवली आहे.
रविकांत मनासा गावात पाणीपुरी विकतो. रविकांतला लहानपणापासून पायलट बनायचे होते. लहानपानापासूनच त्याने आपले स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले. यासाठी दिवसरात्र कष्ट घेतले. त्याच कष्टाचे आता चीज झाले असल्याचे दिसत आहे.
रविकांतची भारतीय हवाईदलात पायलट म्हणून निवड झाली आहे. त्याचे वय २१ वर्ष आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात एयरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट क्लियर केली. त्याच्यासाठी आव्हानं आणि अडचणी भरपूर होत्या. करोना काळात त्यांचा ठेला बंद झाला होता. साधारण दीड वर्ष कर्ज काढून वडिलांनी कसंबसं घर चालवले. दरम्यान, या सर्व अडचणींना दूर करत रविकांतने हे यश मिळवले आहे.