मुंबई -भाजप नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबत केलेले विधान ताजे असताना रविवारी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ज्यात दानवे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताना दिसतात. आता या व्हिडिओबाबत स्वतः रावसाहेब दानवे यांनी माफी मागत खुलासा केला आहे.
दानवेंचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ २ वर्षांपूर्वीचा असल्याचे समजते. तसेच याबाबात दानवेंनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दानवे यांनी बोलताना “मला सुद्धा वाटत शिवाजीबद्दल असं वक्तव्य कोणी करू नये,परंतु शिवाजीचा अवमान करण्यासाठी केलेलं ते वक्तव्य आहे का ?” याचा सर्व समाजाने विचार केला पाहिजे” असं दानवे या व्हायरल व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
दिलगिरी व्यक्त करत दिल हे स्पष्टीकरण
रावसाहेब दानवे यांनी हा व्हिडीओ २ वर्षांपूर्वीचा असलयाचे म्हंटले आहे. तसेच नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्याकडून अनावधानाने एकेरी उल्लेख झाला होता त्यामुळे माझ्यावर टीकाही झाली होती तसेच मी त्यावेळी देशवासीयांची माफी देखील मागितली होती असा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. आज अशा प्रकारचं कोणताही विधान मी केलेलं नाही तरीही पुन्हा एकदा जनतेची माफी मागतो असं रावसाहेब दानवे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.