ऊसतोड महिला हिरकणींची अशीही कथा

उसाचे ट्रक, ट्रॉली रिचवून दाखवून देतात आपली उंची

राजेगाव – पहाटे पाच वाजता उसाच्या फडात जायचं… दिवसभर ऊस तोडायचा… तो बांधायचा…आणि रात्री-बेरात्री कडाक्‍याच्या थंडीत वाहने भरून द्यायची; पण एवढं करूनही रस्त्यावरून जाताना उसाने भरलेली वाहने रस्त्यावर पडतात तेव्हा मात्र उसतोडणी मजुरांचा संघर्ष जीवनाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो.

पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करून, दमून आपल्या झोपडीत थोडा आराम घेत असलेल्या उसतोडणी कामगार महिला रात्री-अपरात्री पुन्हा उसाच्या मोळ्या भरण्यासाठी निघतात. आपल्या अर्धनग्न चिमुरड्यांना कुशीत घेऊन त्यांना मायेची ऊब देण्याचं भाग्य क्वचितच त्यांना लाभते. संसाराची धुरा सांभाळत या ऊसतोड महिला उसाचे ट्रक, ट्रॉली रिचवून आपली उंची दाखवून देतात.

त्यांच्या या दुःखावर फुंकर मारायला कुणीही तयार होत नाही.शेकडो किलोमीटरवरून आपला तुटपुंजा संसार घेऊन आलेली ही कुटुंबे ऊसतोड करून जगतात खऱ्या; पण कधी कधी अनेक धोक्‍यांचा सामना करत आपल्या प्राणाला मुकतातही. असे असले तरी महिला ऊसतोडणी मजुरांच्या व्यथांचा थोडा तरी माणुसकीच्या नात्याने सर्वच स्तरातून विचार होणे गरजेचे आहे.

गरोदर मातांची व्यथा ऊस तोडणीवर असतानाच प्रसूती होणं, रुग्णालये व इतर सुविधांविना नवजात बालकांना त्याच ठिकाणी जमिनीच्या पोटात घालणं मनाला हेलावून टाकतं. सहा महिने गावाकडे आणि सहा महिने परजिल्ह्यात जाण्याने साऱ्या संसाराची फरफट होते. ना पाणी, ना वीज, ना अन्य जीवनावश्‍यक सुविधा…! काबाडकष्ट करून मुलांना दोन वेळचं जेवण पुरवण्याचीही कमाई कधी कधी त्यांना उपाशी ठेवते. अशा स्थितीत त्यांच्या बालकांना शिक्षण काय मिळणार? आपली जबाबदारी झटकून टाकणारे साखर कारखाने केवळ आपल्या कामाशी काम ठेवत माणुसकीला पायंदळी तुडवत केवळ आपल्या उत्पन्नातच भर घालताना दिसतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here