बेशिस्तीचा शॉर्टकट ठरू शकतो जीवघेणा

वाहतूक कोंडी, निश्‍चितस्थळी जलद पोहोचण्यासाठी पदपथावरून वाहनांची घुसखोरी

– कल्याणी फडके

पुणे – सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी.. गर्दीतून पुढे जाण्यासाठी वाजणारे कर्कश्‍श हॉर्न.. काही सेकंदामध्ये नियम आणि पादचाऱ्यांची पर्वा न करता बेदकारपणे पदपथावरून ये-जा करणारे वाहनचालक… जीव मुठीत धरून चालणारे नागरिक आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष ही परिस्थिती प्रत्येकाला नित्याचीच झाली आहे.

शहरातील वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी अनेकजण “शॉर्टकट’चा अवलंब करतात. यामध्ये प्रामुख्याने पदपथावरून वाहन चालविण्याचा समावेश आहे. मात्र, यामुळे अपघात होण्याची शक्‍यता अधिक आहे. नागरिकांच्या “अशा’ वाहनचालविण्यामुळे अनेक ठिकाणी पदपथावर बसविलेले बोलार्डदेखील गायब झाले आहेत.

स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिकेकडून मागील काही वर्षांपासून पदपथ “रुंदीकरणा’चे काम हाती घेतले आहे. मात्र, या “रुंदीकरणा’मुळे पादचाऱ्यांना नव्हे तर, बेशिस्त दुचाकीचालकांना रस्ता मिळत आहे. अतिक्रमणे आणि विक्रेत्यांनी व्यापलेले पदपथ सध्या दुचाकीचालकांसाठी “शॉर्टकट’ ठरत आहे. पादचाऱ्यांना व्यवस्थित चालता यावे, यासाठी महापालिका आणि वाहतूक विभागाने बोलार्ड बसविले. मात्र, दुचाकीचालक याला न जुमानता बेदकारपणे दोन बोलार्डमधून वाट काढत वाहने चालवितात. वाहतूक पोलिसांची नजर चुकवून दुचाकीचालक पदपथावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे. पदपथावरून वाहन चालविल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागते. यामुळे अपघातांचा धोका अधिक असल्याचे पादचारी सांगतात.

जीवावर बेतण्याची शक्‍यता
लाल सिग्नल असताना पुढे जाण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पदपथावरून बेदकारपणे वाहने चालवितात. हा “शॉर्टकट’ बेशिस्त वाहनचालकासह पादचारी आणि अन्य वाहनचालकांच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता अधिक असते. पदपथाच्या सुरुवातीला (वाहन पदपथावर चढविताना) आणि शेवटी (रस्त्यावर वाहन वळविताना) वाहनाचे चाक घसरण्यासह वाहनावरील नियंत्रण सुटते, असे निरीक्षण वाहतूक विभागाकडून नोंदविण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.