बंगळूरू : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रडार यंत्रणेच्या संशोधनात महत्वाची कामगिरी बजावत असल्याने आपल्यावर अर्सेनिकचा विष प्रयोग तीन वर्षापुर्वी झाला होता, असे इस्रोचे वरीष्ठ शास्त्रज्ञ तपन मिश्रा यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. भारत सरकारकडून खरेदीची ऑर्डर गमावण्याचा धोका असलेल्यांचा यात सहभाग असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
आपल्यावर अर्सेनिक ट्रायऑक्साईड या प्राणघातक विषाचा वापर 23 मे 2017ला बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयात एका प्रमोशनल मुलाखतीच्या दरम्यान करण्यात आला. या अत्यंत उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा विचार करून रडार इमेजिंग सॅटेलाईट म्हणजे “रिसॅट’च्या विकासामध्ये माझा सहभाग होता. आम्ही हे तंत्रज्ञान वापरून पृथ्वीच्या कोणताही कोपरा कोणत्याही वेळेला, दिवस असो वा रात्र, आम्ही पाहू शकणार होतो, असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण स्वदेशी बनावटीची असल्याने ती अन्य देशांकडून विकत घ्यायची झाल्यास त्यांच्या दराच्या तुलनेत दहा पट स्वस्त होती. ही यंत्रणा लष्करासाठी उपयुक्त ठरणार होती. कारण ढग आणि धूळ असली तरी ही यंत्रणा छायाचित्र पाठवू शकली असती. जर ही यंत्रणा आम्ही बनवली तर ती विकू इच्छिणसऱ्यांना त्यांचा व्यवसाय गमवावा लागला असता, असे स्पष्ट कारण त्यांनी दिले.
मिश्रा हे सध्या इस्रोचे वरीष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या महिन्याअखेर ते निवृत्त होत आहेत. यापुर्वी त्यांनी इस्रोच्या अहमदाबाद येथील केंद्राचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. याबाबत जागृती करावी आणि असा कट रचणाऱ्यांना विरोध दर्शवावा, म्हणून ही माहिती जनतेसमोर आणत आहे. ही माहिती उजेडात येऊ नये म्हणून निवृत्तीपूर्वी माझ्यावर असा प्रयोग आणखी एकदा होऊ शकतो. पण आता मला काय झाले हे सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे मला काही झाल्यास माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी विष प्रयोगाचा हा प्रयोग फेसबुकवर “दीर्घकाळ लपवलेले गुपित’ या नावाने पोस्ट केले आहे. जुलै 2017 मध्ये त्यांना गृह खात्याचे अधिकारी भेटले आणि त्यांनी नेमकी उपचार पध्दती सांगितली. या विषप्रयोगामुळे आपल्याला श्वसनाच्या त्रासाचे आणि त्वचेच्या अनेक समस्यांनी ग्रासल्याचे त्यांनी सांतिले. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एम्सचे वैद्यकीय अहवाल जोडले आहेत.