कराड- कराड तालुक्यातील पाचवड फाट्या नजीक असलेल्या नांदलापूर गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रं 4 ओलांडताना एका बिबट्यास अज्ञात गाडीने जोराची धडक दिली. वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता, काही काळ तो महामार्गावर ठाण मांडून बसला होता.मात्र त्यानंतरही त्याने तिथून धूम ठोकली. बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाल्याने परिसरातील स्थानिक लोकांच्यात घबराट निर्माण झाली आहे.
बिबट्या महामार्गावर पश्चिमे कडील साईड पट्टी जवळ पडला व त्या जागेवर बसून राहिला. येणाऱ्या जाणाऱ्या अनेक जणांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती,वाहनाची जोराची धडक बसल्यामुळे बिबट्या बराच वेळ महामार्गाच्या साईटपट्टीवर बसून होता.अपघातामुळे बिबट्याचा जखमी झाला होता.
बिबट्या जवळपास 15 मिनिटे जागेवर बसून होता. साधारण 15 मिनिटांनी बिबट्या जागेवरून उठून अतिशय जलद वेगाने महामार्ग ओलांडून क्षणात पूर्वेकडील सेवारस्यावरून वर येऊन उसाच्या शेतात शिरला.
धडक बसलेला बिबट्या महामार्गावर पडलेला असल्याची माहिती घटनास्थळी जमलेल्या लोकांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.भाटे यांनी उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व वनरक्षक रमेश जाधवर यांना माहिती दिली व घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी पोहचले. वनरक्षक हे घटनास्थळी पिंजरा घेऊन दाखल झाले.
बिबट्या हा उसाच्या रानात आत शिरला होता.ऊस हा मोठा असल्याने व रात्रीची वेळ असल्याने उसाच्या आत शोध मोहीम राबविणे धोक्याचे व कठीण होते. सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 7 वाजल्यापासून घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. घटनास्थळी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल सवाखंडे,वनरक्षक रमेश जाधवर,प्रशांत मोहिते,उत्तम पांढरे,मंगेश वांजारे,सचिन खंडागळे,पोलीस पाटील शिर्के, व वनमजुर हे शोध घेत आहेत.