पंचायत समिती सभापतींचे आरक्षण
नगर जिल्ह्यात चौदा पंचायत समिती आहेत. लोकसंख्येनुसार सभापतीपदाचे आरक्षण असणार आहेत. यात अनुसूचित जातींसाठी दोन जागा राखीव असणार असून त्यात एक महिला असेल.अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव असेल,नागरिकांचा मागास प्रवर्ग या वर्गासाठी चार जागा राखीव असून त्यात दोन महिलांसाठी राखीव असतील.तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 7 जागा असून त्यातील चार जागा महिलांसाठी राखीव असेल. गुरुवारी,.दि.12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सभापतीपदाची आरक्षण सोडत निघल्यानंतर या निवडी होतील.
नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची मुदत 20 डिसेंबरला संपत असल्यामुळे सदर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच होणार आहे. मात्र सदर पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपत होती. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना जानेवारीपर्यंत मुदतवाढीची अपेक्षा होती.मात्र,शासनाने डिसेंबरमध्येच या निवडी धेण्याचे निर्देश दिल्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
विधानसभा निवडणुकांमुळे शासनाने दि.23 ऑगस्ट 2019 रोजी चार महिन्यांसाठी सदर पदाधिकाऱ्यांना मदतवाढ दिली होती.ती 20 डिसेंबरला संपत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती – उपसभापती निवडीचा कार्यक्रम घेण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
आधी या निवडी 20 तारखेच्या आत घेण्याच्या सूचना संबंधीतांनी दिल्या होत्या पण आज परत नवे परिपत्रक काढून 20 तारखेनंतर या निवडी घेण्यास सांगितल्यामुळे आता नव्याने निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. पंधरा दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.त्यात नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण वर्गासाठी राखीव निघाले आहे. तसेच पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी, दि.12 काढण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद गटनेतेपदाचा वाद होणार
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे आहेत.मात्र माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे ते भाजपसोबत राहणार असल्याची उघड चर्चा आहे. ते राष्ट्रवादीच्या सदस्यांना भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप बजावू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांनाच या पदावर ठेवणार की बदलणार याची उत्सुकता जिल्हा परिषद गटात आहेत. आज कैलास वाकचौरे व भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्वीय सहाय्यक घोगरकर यांच्यासमवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत होते. गटनेते व त्यांच्या व्हीप बजावण्याच्या अधिकाराबाबत निवडणूक शाखा मात्र अनभिज्ञ आहे.