मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. 2 मे 2023 रोजी एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मात्र आज तिसऱ्या दिवशी देखील कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायला सुरुवात केली. आज अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. त्यादरम्यान राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर यावेळी कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीवर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जमली आहे. मात्र घोषणाबाजी दरम्यान एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. परंतु इतर कार्यकर्त्यांच्या आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे वेळीच या कार्यकर्त्याला अडवण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
सध्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातील बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित आहेत. मात्र कार्यालयात बैठक आणि बाहेर गोंधळ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत.