नवी दिल्ली –राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी पाकिस्तानात आश्रय घेतलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा साथीदार छोटा शकिल यांच्यासह पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. जागतिक दहशतवादी नेटवर्क आणि संघटित गुन्हेगारी टोळी चालवण्याशी संबंधित प्रकरणावरून ते पाऊल उचलण्यात आले.
संबंधित प्रकरणी चालू वर्षी फेब्रुवारीत एनआयएने गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह दाऊद आणि शकिलविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. डी-कंपनी या दाऊदच्या टोळीने आपल्या कारवाया वाढवण्याचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न झाले. ती टोळी धमक्या देऊन अनेकांकडून खंडणी गोळा करत आहे.
सामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी त्या कारवाया केल्या जात आहेत. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा त्या टोळीचा नापाक डाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना परदेशांतूनही हवालामार्गे मोठ्या रकमा मिळाल्याचे स्पष्ट झाले, असे एनआयएकडून नमूद करण्यात आले. त्यातून एनआयएच्या रडारवर दाऊद टोळी असल्याचे सूचित झाले.