Virat Kohli – मुंबईतील एका चाहत्याने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त भिंतीवर चेंडू पासून त्याचे छायाचित्र बनवले आहे. हा चेंडूपासून बनवलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या विराटच्या चित्राची उंची २० फूट असून २० फूट रुंद आहे. गुरसीत सिंग नावाच्या विराट कोहलीच्या चाहत्याने ही कलाकृती तयार केली आहे. त्याने शनिवारी मुंबईतील कार्टर रोड अॅम्फी थिएटरमध्ये ५००० चेंडूंचा वापर करून हे चित्र बनवले आहे.
“धोनीशी रोहितची तुलना कधीच होऊ शकत नाही”, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच भाष्य!
गुरसीत यांनी सकाळी आठ वाजता चित्र बनवण्यास सुरुवात केली आणि सुमारे नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यात यश मिळवले. यावेळी विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्माही तेथे उपस्थित होते. ते म्हणाले की, “हे अद्भुत असेच असून मी विराटला हे नक्की पाठवीन. हे पाहून मला खूपच अभिमान वाटतो आहे. विराटला ( Virat Kohli ) त्याच्या चाहत्यांकडून इतकं प्रेम मिळतंय हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”
यावेळी अनेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ९४ वर्षीय धावपटू भगवानी देवी, फुटबॉलपटू ग्लेन मार्टिन्स आणि अन्वर अली, क्रिकेटपटू अनुज रावत आणि जलतरणपटू श्रीहरी यांचाही समावेश होता. यावेळी बॉलिवूड अभिनेता आणि कोहलीचा ( Virat Kohli ) मोठा चाहता ईशान खट्टरही तिथे उपस्थित होता. कोहलीचा हा ३४ वा वाढदिवस असून सध्या तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळत आहे.
कोहलीने ( Virat Kohli ) त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १०२ कसोटी, २६२ एकदिवसीय आणि ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४९.५३ च्या सरासरीने ८०७४ धावा केल्या आहेत. यामध्ये २७ शतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने५७.६८ च्या सरासरीने १२,३४४ धावा केल्या आहेत. यामध्ये ४३ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ११३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५३.१३ च्या सरासरीने ३९३२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.