औरंगाबाद – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता विविध पक्षांनी ग्रामीण भागात मोर्चेबांधणीवर जास्त भर देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पक्ष विस्ताराला गती दिल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादमधील पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का देत त्यांच्या पक्षातील मातब्बर नेते राष्ट्रवादीत आणले.
गंगापूर कॉंग्रेससासाठी हा मोठा धक्का आहे. गंगापूर कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह आणखी कॉंग्रेसी सहाकाऱ्यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा स्वागत सोहळा पार पडला.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सलग 15 वर्षे भूषवलेले संजय जाधव यांनी आज कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय जाधव यांनी गंगापूर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापतीदेखील होते. संजय जाधव यांच्यासोबत अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.