पाबळ – देशभर करोना धुमाकूळ घालत आहे. प्रशासन रात्रंदिवस करोनाला हद्दपार करण्यासाठी धावपळ करीत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत असताना वेगळे अनुभव येत आहेत.
पाबळसारख्या ग्रामीण भागात याबाबत मोठी जागृती आहे. तब्बल 36 दिवसांपासून सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे याबरोबर गर्दीचा वावर टाळणे या उपाययोजना होत असताना, पाबळ येथील मुस्लिम बांधवांनी या जाणिवेत मोठा सहभाग नोंदवला आहे.
लॉकडाऊन काळात मशिदीतील सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवले आहेत. शिवाय पवित्र रमजान महिन्यातही दररोजची नमाज आदी धार्मिक कार्यक्रम घरी करत आहेत. पाबळ येथील जामा मशिदीचे मौलवी मशिदीत दररोजचे धार्मिक कार्यक्रम स्वतः व एकटेच पार पाडत आहेत.
इन दिनो सब इकठ्ठा आते है। लेकीन इस दौर करोना व्हायरस की वजहसे कोई बिमारी न फैले, इसलिए सब लोग अपने अपने घरोमें नमाज अदा कर रहे है।
– महंमद असिफ रजा, मौलवी
पाबळ येथील समस्त मुस्लिम बांधवांचे वतीने, अल्ला आणि परमेश्वराला हीच प्रार्थना आहे की, हा करोना व्हायरस लवकरात लवकर आमच्या भारतातून हटावा. यासाठी सर्व बांधव घरीच नमाज ईबादत आणि इतर कार्यक्रम करत आहेत. आमचे मौलवी, पुजारी एकटेच या मशिदीत नमाज आणि ईबादत व इतर धार्मिक कार्यक्रम करीत आहेत.
– शौकत इनामदार,व्यापारी पाबळ