शिर्डी – हैदराबाद येथील साईभक्त भूपाल कामेपल्ली यांनी त्यांचे फर्म के. भूपाल इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.तर्फे साईचरणी 310 ग्रॅम वजनाचा 20 लाख रुपये किमतीचा नवरत्न व मोतीजडित सोन्याचा हार, तसेच 31 हजार 752 रुपये किमतीचे चांदीचे ताट, वाटी, प्लेट, ग्लास व 2 लाख रुपये देणगीचा धनादेश साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिला.
शिर्डीतील साईबाबा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सन 2022मध्ये साईबाबा संस्थानला देणगीरूपी 400 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. सरासरी बाबांच्या झोळीत प्रत्येक महिन्याला जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त देणगी भक्त दान स्वरूपात देतात. विविध राज्यांतून अनेक दानशूर भक्त बाबांना सोने, हिरे, चांदीचे अलंकार बाबांच्या चरणी दान करताना दिसत आहे. काकडी विमानतळ, तसेच समृद्धी महामार्ग सुरू झाल्याने साईबाबांचा शिर्डीला येण्यासाठी गर्दी वाढली आहे.
याबरोबरच आता मुंबई ते शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यामुळे शिर्डीला येणाऱ्या भक्तांच्या संख्येत अधिक वाढ होणार आहे. भक्तांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी संस्थांनी उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. अद्ययावत दर्शनरांग सुरू झाल्यानंतर साईभक्तांना दर्शन घेण्यासाठी सोपे होणार आहे.