राहाता -ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राहाता शहरात घर टू घर आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू केले आहे. आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य सहाय्यकास हवी असलेली सर्व माहिती देवून सहकार्य करावे त्यांनी विचारलेल्या आजाराविषयी कुठलीही माहिती दडवून ठेवू नये, असे आवाहन राहाता ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहता ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राहाता शहरातील सर्व प्रभागात सारीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघर जाऊन घरातील व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असे आजार आहेत की नाही याविषयी चौकशी करत आहेत. या माहितीच्या नोंदी घेतल्या जात आहेत. त्याचप्रमाणे परगावाहून कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पाहुणे मित्र आलेले आहेत की नाही.
या संदर्भातही आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. या आरोग्य सर्वेक्षणासाठी राहाता शहरासाठी आरोग्य सहाय्यकाचे चार पथके तयार करण्यात आले आहे. पथकातील आरोग्यसेवक घरोघर जावून घरात कुणाला सर्दी, खोकला, ताप, घसा, दुखी आहे. का यासंदर्भात माहिती नोंद करणार आहेत. या प्रकारची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णास शासकीय रूग्णालयात नेऊन त्याची तपासणी करून त्यावर उपचार केले जाणार आहेत.
नागरिकांनी सर्दी, खोकला, घसा, ताप, अथवा घसादुखी असल्यास घाबरून न जाता ग्रामीण रूग्णालयात येवून तपासणी करावी व उपचार घ्यावे, घरी आलेल्या आरोग्यसेवकापासून खरी माहिती लपवून ठेवू नये, असे केल्यास तो गुन्हा ठरेल. तसेच खरी माहिती दडवून ठेवल्यास भविष्यात कुटुंबांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नागरिकांनी स्वतःची कुटुंबाची व सामाजिक स्वास्थ्य याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी डॉ. घोगरे यांनी केले.