उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब; अडीचशे कोटींचा खर्च अपेक्षित
पुणे – असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती बनलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकातील उड्डाणपूल अखेर जमीनदोस्त होणार आहे. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार असून मेट्रोसह दुहेरी मार्ग असलेला हा दुमजली नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 250 कोटींचा खर्च अपेक्षित असून तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
पीएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गात हा पूल अडथळा ठरत असल्याने तसेच तो बांधण्यात आल्यानंतरही वाहतूक कोंडी सुटत नसल्याने तो पाडण्याची मागणी होत होती. त्याबाबत शनिवारी पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीत हा पूल पाडण्यास अखेर मान्यता दिली आहे. तर लॉकडाऊनच्या कालावधीतच हा पूल पडण्याची तयारी टाटा कंपनीने या बैठकीत दर्शविली आहे.
चौकातून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका जाते. या मेट्रोसाठी हा पूल अडचणींचा ठरत होता. त्यामुळे हा पूल पाडून त्याजागी नवीन दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव पीएमआरडीए कडून देण्यात आला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार, आमदार आणि महापालिकेच्या सर्व पदाधिकारी, तसेच पीएमआरडीए आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यावेळी या पुलाबाबतच्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
मात्र, त्यात हा पूल पाडून या चौकात चारही दिशांनी येणाऱ्या वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी नव्याने पूल उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याचा विचार करून नवीन पूल बांधण्यावर एकमत करण्यात आले. दरम्यान, हा पूल कर्वे रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या दुमजली पुलाप्रमाणेच बांधण्यात येणार असून वरील बाजूस मेट्रो तर खालील रस्त्यावरून वाहनांची वाहतूक असणार आहे. तसेच या चौकात येणारे सर्व रस्ते लक्षात घेऊन नवीन पूल वाहतूक कोंडी सुटण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.