नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला आता दीड महिना उलटून गेला आहे. तेंव्हापासून व्यवसाय थांबला. त्यात घरातील आधीच तुटपुंजी असलेली साधनसामुग्री संपुष्टात आली. त्यामुळे रिक्षाचालकांचा मोठा कोंडमारा झाला. अशास्थितीत त्यांच्या मदतीसाठी नगरमधील प्रेरणा प्रतिष्ठानाने धाव घेतली आहे. शहरातील रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन त्यांना मदतीचा हात दिला.
आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. लॉकडाऊन घोषित झाल्याने रिक्षांची चाके जागेवरच थांबली. त्यामुळे केवळ रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शहरातील अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे प्रेरणा प्रतिष्ठानाने पुढाकार घेऊन रिक्षाचालकांच्या थांबलेल्या संसाराला संजिवनी देण्याचा उपक्रब राबविला.
अहमदनगर जिल्हा ऑटो, रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेच्या सदस्यांनी ही अडचण आमदार संग्राम जगताप यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने किराणा साहित्य वाटपाचा निर्णय घेतला. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सल्लागार विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर, लतीफ शेख, रावसाहेब काळे, रवींद्र वाबळे, अशोक कारळे, राहुल गोरे, राजेंद्र टिपरे, मुन्ना शेख आदिंसह रिक्षाचालकांच्या उपस्थितीत हा उपक्रम आज सुरु करण्यात आला.
शहरात निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर नवीन घेण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे रिक्षांचा अत्यावश्यक सेवेत समावेश होत नसल्याने त्यांना बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. दररोज शहराच्या विविध भागात रिक्षा धावत असतात. मात्र, लॉकडाऊनचा काळ रिक्षाचालकांसाठी मरण यातना देणारा ठरला. कर्जाचे हप्ते कसे फेडावे? हा गंभीर प्रश्न देखील त्यांना भेडसावत आहे. शिपवर (भाड्याने) दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या चालकांच्या कुटुंबाची अत्यंत बिकट परस्थिती आहे, असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सामाजिक भावनेतून सर्वांनीच मदत केल्यास हातभार लागेल. शहरात असे अनेक गरजू आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. जागतिक महामारीचे संकट भविष्यात निघूनही जाईल. मात्र, आत्ता ज्यांना मदत मिळणार नाही, त्यांची भविष्यातील मानसिकता खूप वेगळी असेल. त्यामुळे सर्वांमध्ये माणूसपण टिकविण्यासाठी कोणताही बडेजाव न मिरविता मदत करण्याचा सर्वांनीच प्रयत्न करावा. याकडे फक्त माणुसकी म्हणूनच पहावे..
आमदार संग्राम जगताप, संस्थापक, प्रेरणा प्रतिष्ठान, नगर