कोलकाता – कर्णधार नितिश राणा व रिंकू सिंग यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून 23 धावांनी पराभव पत्करावा लागला.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. भरात असलेला रेहमनुल्ला गुरबाज पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर व्यंकटेश अय्यरनेही साफ निराशा केली. त्यानंतरच्याच चेंडूवर मार्को जेन्सने सुनील नरेनलाही तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी कोलकाताची स्थिती 3 बाद 20 अशी बिकट बनली होती. यावेळी एका बाजूने भक्कमपणे खेळत असलेल्या एन. जगदीशनने कर्णधार नितिश राणासह डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली. जगदीशनने धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली.
मयंक मार्कंडेयच्या गोलंदाजीवर तो 36 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 21 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला. तो बाद झाल्यावर आंद्रे रसेलनेही निराशा केली. दरम्यान राणाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने रिंकू सिंगसह संघाचे शतक फलकावर लावले. यावेळी त्यांना 48 चेंडूत 118 धावांची गरज होती. या जोडीने 69 धावांची भागीदारी करताना संघाचे दीडशतक पूर्ण केले.
मात्र, विजय खूपच दूर होता व राणाने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करताना आपली विकेट बहाल केली. त्याची 75 धावांची जिद्दी खेळीही व्यर्थ ठरली. त्याने या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारून कोलकाताला अविस्मरणिय विजय मिळवून देणारा रिंकू सिंग खेळपट्टीवर होता मात्र, त्याला साथ देण्यासाठी कोलकाताचे फलंदाज कमी पडले. राणा परतल्यावर शार्दुल ठाकूर खेळपट्टीवर आला तेव्हा कोलकाताला विजयासाठी तीन षटकांत 58 धावांची गरज होती. रिंकूने थाटात फलंदजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अखेरच्या षटकांत त्यांना विजयासाठी 32 धावांची गरज होती. या षटकांत उमरान मलिकने शार्दुल ठाकूरला बाद केले. यानंतर आलेल्या उमेश यादवने एक धाव घेत रिंकूला फलंदाजीची संधी दिली व रिंकूनेही षटकार खेचला मात्र, आवश्यक धावांची पूर्तता करता आली नाही व कोलकाता संघाला 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रिंकू 31 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला. उमेशने नाबाद 1 धाव केली. कोलकाताचा डाव 20 षटकांत 7 बाद 205 असा रोखला गेला. हैदराबादकडून मयंक मार्कंडेय व मार्को जेन्सनने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, हॅरी ब्रुक याचे आक्रमक शतक तर, एडन मार्करम, अभिषेक शर्मा व हेनरीच क्लासेनच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 229 धावांचे आव्हान ठेवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या मोसमात पहिलेच शतक फटकावण्याची कामगिरी ब्रुकने केली.
कोलकाताचा कर्णधार नितिश राणाने नाणेफेक जिंकत हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर हॅरी ब्रुकने मयंक आग्रवालच्या साथीत संघाला 46 धावांची आक्रमक सलामी दिली. आग्रवाल मात्र, त्यात केवळ 9 धावांचेच योगदान देऊ शकला. तो बाद झाल्यावर राहुल त्रिपाठीही 9 धावा करून परतला. यावेळी हैदराबादची स्थिती 2 बाद 57 अशी होती. ब्रुकला साथ देण्यासाठी एडन मार्करम खेळपट्टीवर आला व त्याने वादळी फलंदाजी करत अर्धशतकही साकार केले. त्याने 26 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत 50 धावांची खेळी केली व संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, लगेचच तो देखील बाद झाला.
दरम्यान ब्रुकनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने अभिषेक शर्माच्या साथित संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत 32 धावा केल्या. त्यात त्याने 17 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर आलेल्या हेनरीच क्लासेनने ब्रुकला सुरेख साथ केली. त्याने ब्रुकच्या साथित संघाला द्विशतकी पल्ला पार करून दिला. ब्रुकने यंदाच्या स्पर्धेतील पहिलेच शतक साकार केले. त्याने 55 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावांची खेळी केली. क्लासेनने नाबाद 16 धावांची खेळी करताना 6 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला.
लक्षवेधी
ब्रुकचे शतक व मार्करमची आक्रमक अर्धशतकी खेळी
नितिश राणाचे अर्धशतक व्यर्थ
रिंकू सिंगची
जिद्दी खेळी
रसेलची भेदक गोलंदाजी
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 4 बाद 228 धावा. (एडन मार्करम 50, अभिषेक शर्मा 32, हॅरी ब्रुक नाबाद 100, हेनरीच क्लासेन नाबाद 16, आंद्रे रसेल 3-22, वरुण चक्रवर्ती 1-41). कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 7 बाद 205 धावा. (नितिश राणा 75, एन. जगदीशन 36, रिंकू सिंग नाबाद 58, मार्को जेन्सन 2-37, मयंक मार्कंडेय 2-270.