सातारा – सातारा विकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या ग्रेड सेपरेटरची मागणी चक्क हॉरर शो आयोजित करण्यासाठी भाडेतत्त्वावर मागण्यात आली आहे. साताऱ्यातील रविवार पेठेतील बालगोपाल मित्र मंडळाने ही मागणी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून या मागणीचे निवेदन सातारा पालिकेच्या बारनिशीमध्ये दाखल केले आहे.
या निवेदनावर मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सतीश माने यांची स्वाक्षरी आहे. नगरपालिकेला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की सातारा पालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवई नाक्यावर बांधलेल्या ग्रेड सेपरेटरचा अत्यंत कमी वापर होत आहे. दिवसाला नऊ ते दहा वाहनेच या ग्रेड सेपरेटरमधून जात असतात. सातारकरांकडून सुद्धा या ग्रेड सेपरेटरचा अत्यंत कमी वापर होतो.
बाल गोपाल मित्र मंडळ दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. नवरात्र उत्सवामध्ये सातारा शहरामध्ये ग्रामीण भागातील अनेक भक्तगण येत असतात. त्यामुळे देवीचे देखावे हा त्यांच्यासाठी आकर्षणाचा विषय असतो. ग्रेड सेपरेटरमध्ये हॉरर शो आयोजित करण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी, अशी मागणी बालगोपाळ गणेश मंडळांने निवेदनाद्वारे केली आहे. मुळात ग्रेड सेपरेटर 60 कोटी रुपये खर्चून तयार केला आहे. मात्र, या ग्रेड सेपरेटरची मागणी चक्क हॉरर शोसाठी भाड्याने झाल्याने पालिका प्रशासनही चक्रावले आहे.